कुत्रा चावलेल्या गरोदर महिलेला गर्भपाताचे इंजेक्शन

धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील अवधूतवाडी येथील एका गरोदर महिलेला कुत्रा चावल्याने त्या दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने महिलेला कम्पाऊंडरने इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच त्या महिलेला मळमळ, उलटी, चक्कर, अशक्तपणा व रक्तस्त्रावचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, महिलेला दिलेले इंजेक्शन रेबिजचे नसून गर्भपाताचे होते, त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला.

गरोदर महिला मंगळवारी दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबिजची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तेथील कम्पाऊंडरने डॉक्टरला फोन लावून कोणते इंजेक्शन देऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन कम्पाऊंडरने दिले. मात्र इंजेक्शन देताच महिलेला त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना धाराशिव येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रात देण्यात आलेले इंजेक्शन स्त्री रुग्णालयात दाखवल्यानंतर हे इंजेक्शन कुत्रा चावल्यावर देण्याचे नसून ते गर्भपात होण्याचे आहे व त्यामुळेच हा त्रास सुरू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे महिला आणि तिच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. फोनवरून उपचार करणारे डॉक्टर व प्रत्यक्ष इंजेक्शन देणाऱ्या कम्पाऊंडरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याने तत्काळ दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत, तर एका नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top