किसान क्रेडिट कार्डवर मिळणार 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या योजनेविषयी

Kisan Credit Card : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख घोषणा किसान क्रेडिट कार्ड योजनेसंदर्भातील आहे. आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड नक्की काय आहे व याचा शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल? याविषयी जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे?

किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात 1998 मध्ये झाली होती. नाबार्डच्या शिफारसीनंतर या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यांतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात उपलब्ध झालेल्या कर्जाच्या माध्यमातून बियाणे, खत, कीटकनाशकं आणि इतर कृषी उपकरणे खरेदी करण्यास मदत मिळते.

कोणाला मिळते किसान क्रेडिट कार्ड?

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कृषीसह मत्स्य पालन, डेअरी फार्मिंग, पशुपालनीशी संबंधित शेतकऱ्यांना मिळतो. या अंतर्गत आता शेतकऱ्यांना 3 लाखांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे, या कर्जाचे व्याजदर 7 टक्के आहे. मात्र, शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड केली, तर त्यांना 3% ब्याज सब्सिडी दिली जाते. अशाप्रकारे, शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदरासह कर्ज उपलब्ध होते.

किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकरी जवळील बँक, लघु वित्त बँक आणि सहकारी संस्थेकडे अर्ज करू शकतात. ओळखपत्र, रहिवासी पुरावा व इतर संबंधित कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.