पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच नियोजित केलेली सभा होती. यावेळी मोदी म्हणाले की, बिहारच्या मातीतून जगाला सांगतो की, कल्पना केली नाही अशी अद्दल अतिरेक्यांना घडविणार आहे. आम्ही अतिरेकी शोधून काढून त्यांचा खातमा करू. संपूर्ण भारत देश यात एकजूट आहे. 142 कोटींची जनता आता अतिरेक्यांना उखडून टाकेल, दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. आम्ही सर्व अतिरेक्यांना गाडणार आहोत. भारताच्या आत्म्यावर हल्ला केला, त्याला सोडणार नाही. ही सर्व वाक्ये ते इंग्रजीत बोलले. कारण हा कठोर संदेश त्यांना जगाला द्यायचा होता.
पंचायत राज कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याआधी मंचावरून मोदी यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रध्दांजली वाहिली. भाषण सुरू करण्यापूर्वी ते म्हणाले की, मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो.तुम्ही जिथे कुठे असाल तिथून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रध्दांजली अर्पण करा, त्यानंतरच मी माझे भाषण सुरू करीन. त्यानंतर त्यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली. ते म्हणाले की, मी आज बिहारच्या भूमीतून संपूर्ण जगाला स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की, भारत दहशतवाद्यांना हुडकून काढणार, त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना त्यांच्या कल्पनेच्या पलिकडचे कठोर शासन करणार, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी ते लपले असले तरी त्यांना शोधून काढणार. हा हल्ला देशाच्या शत्रूने निशस्त्र पर्यटकांवर केलेला नाही. तर देशाच्या आत्म्यावर घातलेला हा घाव आहे. या भ्याड हल्ल्यात कोणी आपला मुलगा गमावला आहे, कोणी आपला भाऊ, तर कोणी आपला जीवनसाथी गमावला आहे. काहींची भाषा बंगाली, काहींची कन्नड होती. काही गुजरातचे, तर काही बिहारचे होते. त्यांच्या मृत्यूबद्दल काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तमाम देशवासियांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे. या मृतांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील या दृढ संकल्पात संपूर्ण देश एकत्र आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आज आपल्यासोबत उभा आहे. त्या सर्व मानवतावाद्यांचे आणि संकटसमयी आम्हाला साथ देणाऱ्या देशांचे मी मनापासून आभार मानतो. जोपर्यंत दोषींना कठोर शासन केले जात नाही तोपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही.
महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाचे स्मरण करून देताना मोदी पुढे म्हणाले की, बिहार ही अशी भूमी आहे जिथून बापूंनी आपला सत्याग्रह सुरू केला होता.जोपर्यंत खेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, हा विचार बापूंनी मांडला आणि आयुष्यभर त्या विचारांची कास धरली. त्यांच्या मार्गावर पावले टाकताना आम्ही पंचायतींना बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दोन लाखांहून अधिक पंचायत कार्यालये इंटरनेटने जोडली गेली आहेत. गावखेड्यांमध्ये साडेपाच लाखांहून अधिक नागरी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सरकारी कागदपत्रे सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे जमिनीचा वाद. यावर उपाय म्हणून जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन केले जात आहे. बिहार हे देशातील पहिले राज्य होते जिथे महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले. त्याबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन करतो. आज दलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या समाजांमधील मुली मोठ्या संख्येने सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत. लोकशाहीतील हा सर्वात मोठा महिलांचा सहभाग आहे.
