कलम ३७० हटवून काय दिवे लावले ? संजय राऊत यांचा भाजपाला सवाल

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा वारंवार मांडणाऱ्या भाजपावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्ला चढवला. कलम ३७० हटवून तुम्ही काय मोठे दिवे लावले,असा सवाल राऊत यांनी केले.
भाजपाचे लोक विधानसभेच्या प्रचारात भाजपाचे नेते काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. पण कलम ३७० हटवून त्यांनी काय मोठे दिवे लावले, हाच खरा प्रश्न आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरी पंडितांची मोठ्या प्रमाणावर घरवापसी होईल,असे भाजपावाले सांगत होते. पण एकही काश्मीरी पंडित पुन्हा आपल्या मूळ घरी परतलेला नाही. काश्मीरचे विभाजन करून मोदी सरकारने लडाखचा लचका तोडला. जम्मू आणि काश्मीर वेगळे केले. मात्र या राज्याला अद्याप स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला नाही. ३७० कलम रद्द करून ना काश्मीरी जनतेचा फायदा झाला ना देशाचा. काश्मीरमध्ये आजही उद्योगधंदे नाहीत.बेरोजगारीची समस्या होती तशीच आहे. आजही लष्कराचे जवान आणि सर्वसामान्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये बळी जात आहे.काश्मीरच्या परिस्थितीत काडीमात्र बदल झालेला नाही,असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० रद्द करण्यास विरोध केला होता,असे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात झालेल्या एका प्रचारसभेत केले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शहा हे एक व्यापारी आहेत. व्यापारी आपल्या फायद्यासाठी ग्राहकांशी नेहमीच खोटे बोलत असतो.उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने कलम ३७० हटविण्याला कधीच विरोध केला नव्हता. उलटपक्षी पाठिंबाच दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top