L&T चे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला किती तास काम करायला हवे याबाबत वक्तव्य केले होते. कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करावे, घरी पत्नीला किती वेळ बघत बसणार असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कामाच्या तासावरून सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील या मुद्यावर मत व्यक्त केले आहे.
खरा मुद्दा काम केलेल्या तासांची संख्या किती हा नाही, तर गुणवत्तेचा आहे. आपण कामाच्या प्रमाणावर नव्हे तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी व्यक्त केले. भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आनंद महिंद्रा म्हणाले की, नारायण मूर्ती आणि इतरांचा मी आदर करतो. त्यांच्या विधानाबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते, ही चर्चा चुकीच्या दिशेला जात आहे. कामाच्या दर्जावर आपण अधिक चर्चा करायला हवी.
तुम्ही 10 तास काम करा; पण यामध्ये तुमचे आऊटपुट महत्त्वाचे आहे. तुम्ही 40 किंवा 90 तास काम केलेत; पण तुमचं कामं उत्तम दर्जाचं नसेल तर त्याचा काय उपयोग आहे?, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यन (S. N. Subrahmanyan) यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे 90 तास काम करायला हवे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून मत व्यक्त केले जात आहे.