बंगळुरू – उत्तर कर्नाटकमधील पिण्याच्या पाण्यासाठी आणि पशुधनासाठी ३ टीएमसी पाणी सोडा अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सिद्धरामय्या यांनी पत्रात नमूद केले की, महाराष्ट्राने मानवतेच्या दृष्टीने नेहमीच कर्नाटकला उन्हाळ्यामध्ये पाणी सोडून मदत केली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. उत्तर कर्नाटकमध्ये तापमान ४० सेल्सिअसपर्यंत गेले आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, रायचूर, यादगीर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकमधील पिण्याच्या पाण्यासाठी आणि पशुधनासाठी महाराष्ट्राने कोयना आणि वारणा धरणातून कृष्णा नदीत दोन टीएमसी आणि उजनी धरणातून एक टीएमसी भीमा नदीमध्ये पाणी सोडावे अशी विनंती आहे.