बंगळुरू- कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात सिगारेट ओढणे,गुटखा खाणे किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी केला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यापुढे सरकारी कार्यालयात
कुणी कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.या संदर्भातील एक पत्रक कर्नाटक सरकारकडून जारी केले आहे. कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने जारी केलेल्या आदेशात असे स्पष्टपणे लिहिले आहे की, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी तसेच सार्वजनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे धूम्रपानापासून संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यामुळे शासकीय कार्यालये आणि कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याकडून धूम्रपानासह तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.