कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते. मात्र,या गिधाडाला अभ्यासासाठी जीपीएस उपकरण बसवण्यात आल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे.
या गिधाडाच्या गळ्यात छोटे चौकोनी यंत्र, पाठीवर यंत्र आणि दोन्ही पायांना रिंगसारखे जीपीएस यंत्र बसवले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी त्यांनी गिधाडाचा फोटो काढला असता त्याच्या अंगावर असलेल्या उपकरणावर कोड पद्धतीची माहिती होती. वन अधिकारी, पोलीस व गुप्तचर यंत्रणा याबाबत शोध घेऊ लागली. मात्र, त्याचवेळी कारवारच्या वन अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील एका शास्त्रज्ञाने संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गिधाडाबाबतचा असलेला संभ्रम दूर झाला. महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील संशोधन संस्थेच्या डॉ.अमित नावाच्या अधिकाऱ्याने
कारवारच्या डीसीएफ रविशंकर यांना फोन करून संपर्क साधला.त्यावेळी आपल्या देखरेखखाली असलेले एक गिधाड कारवारमध्ये आल्याची माहिती दिली.गिधाडाचे प्रजनन वाढविण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी ताडोबा व्याघ्र संरक्षित प्रदेशातील संशोधन संस्था आणि बॉम्बे नॅचरल हिस्टी सोसायटीमार्फत गिधाड प्रजनन कार्यक्रम हाती घेतला आहे.त्याचाच एक भाग हे गिधाड आहे.