मुंबई- सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या ओव्हरहेड वायरवर अचानक बांबू तुटून पडला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे कामावर जायला उशीर होत असल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणे पसंत केले. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेक प्रवासी लोकलमधून उतरून आपल्या मार्गाकडे पायी रवाना झाले होते.
लोकल सेवा ही मुंबईची लाईफलाइन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व काही ना काही कारणांमुळे ही लोकल सेवा कोलमडत आहे. आज सकाळी मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वेट्रॅक शेजारी असलेल्या एका सोसायटीत बांधन्यात आलेले बांबूचे शेड ओव्हरहेड वायरवर येऊन कोसळल्यामुळे या मार्गावरील विद्युत सेवा विस्कळीत झाली. अचानक झालेल्या बिघाडामुळे नक झालेल्या बिघाडामुळे लोकल सेवा काही काळ खोळंबली होती. सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व जलद गतीने जाणाऱ्या लोकल माटुंग्याला थांबल्या होत्या. एवढंच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्या होत्या. परंतु वेळेत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट सुरू केली. या बिघाडाची माहिती मिळाल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने ओव्हरहेड वायरवर कोसळलेले बांबूचे शेड बाजूला करून विद्युत प्रवाह सुरळीत केला. मात्र सकाळी ८.३० पर्यंत येथील जलद मार्गावरील सेवा ही प्रभावित झाली होती त्यानंतर ती सुरळीत झाली. परंतु, मध्य रेल्वेची वाहतूक नेहमी विस्कळीत होत असते त्यामुळे आता प्रवाशांचा संताप होतो.