ओयोमध्ये अविवाहित जोडप्यांना प्रवेश न देण्याचे नक्की कारण काय? वाचा

ट्रॅव्हल बुकिंग करणारी कंपनी ओयोने (OYO) त्यांच्या चेक इन पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे ओयोमध्ये अविवाहित जोडप्यांना प्रवेश मिळणार नाही. ओयोच्या या नवीन नियमामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे ओयोच्या हॉस्पॅटिलिटी सर्व्हिसचा वापर करणाऱ्यांमध्ये तरूण ग्राहकांची संख्या मोठी आहे.

ओयोला (OYO) कमी किंमती चांगली हॉटेल सेवा उपलब्ध करण्यासाठी ओळखले जाते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये असंख्य ओयो रुम्स उपलब्ध आहेत. मात्र, आता कंपनीने त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात कंपनीने उत्तर प्रदेशच्या मेरठपासून केली आहे.

चेक इन पॉलिसीमध्ये बदल करण्याचे कारण काय?

ओयोचे (OYO) चेक इन पॉलिसीमधील बदल उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात सर्वातआधी लागू होतील. त्यानंतर हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये देखील लागू होणार आहे. या नियमांमुळे आता अविवाहित जोडप्यांना ओयोच्या (OYO) भागीदार हॉटेल्समध्ये (OYO Hotels) प्रवेश मिळणार नाही. तसेच, जोडप्यांना ओयो रूम बुक करण्यासाठी विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. ऑनलाइन बुकिंग करतानाही हा नियम लागू असेल.

मागील अनेक दिवसांपासून नागरी सामाजिक संघटनांकडून अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये प्रवेशास बंदी घालावी अशी मागणी केली जात होती. त्याच आधारावर ओयोने (OYO) हा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर शहरांमधून प्राप्त अभिप्रायच्या आधारावर पुढील निर्णय लागू केला जाणार आहे. स्थानिक सामाजिक संवेदनशीलतेच्या अनुषंगाने जोडप्यांना प्रवेश नाकारण्याचा अधिकार ओयोच्या भागीदार हॉटेल्सला असेल. याशिवाय, याद्वारे कंपनी स्वतःची प्रतिमा बदलण्याचा देखील प्रयत्न करत आहे.