मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जातीच्या आधारे मतदान होत नाही आणि ओबीसी समाजाची एकगठ्ठा मते आम्हाला मिळणे कठीण आहे, असे परखड मत मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या धोरणांवर निशाणा साधला.
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने चारसो पारचा नारा दिला. त्याचा वेगळा अर्थ विरोधकांनी जनतेपर्यंत पोहोचवला. पूर्ण बहुमतासाठी २७५ जागांची आवश्यक असताना भाजपाला चारशे जागा कशासाठी हव्या आहेत,असा संशय विरोधकांनी लोकांच्या मनात निर्माण केला. संविधान बदलण्यासाठी, वंचित समाजाचे आरक्षण रद्द करण्यासाठी, देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपाला चारशे जागा हव्या आहेत,असा चुकीचा संदेश विरोधकांनी जनतेमध्ये पसरवला. त्याचा फटका आम्हाला लोकसभेत बसला.आता बटेंगे तो कटेंगे यांसारख्या नाऱ्यामुळे तीच चूक आम्ही पुन्हा करत आहोत,असे मला वाटते. दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री येथे येतो आणि काही घोषणा करतो, हे काही योग्य नाही. महाराष्ट्रात जाती-धर्माच्या आधारे मतदान होत नाही. ओबीसींची एकगठ्ठा मिळणे कठीण आहे,असे अजित पवार म्हणाले.
काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा फायदा महाराष्ट्रात भाजपाला मिळू शकेल का,असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी प्रश्नाला बगल देत महाराष्ट्राची जनता ही राष्ट्रप्रेमी आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न त्यांच्यासाठी राष्ट्रहिताचा ठरतो. त्यादृष्टीने या मुद्दाचा निवडणुकीत लाभ होऊ शकतो,असे उत्तर दिले.