Tips to Prevent Online Fraud: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यूपीआय स्कॅम, डिजिटल अरेस्ट अशा विविध माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. तुम्ही देखील ऑनलाइन माध्यमातून जास्त व्यवहार करत असाल अथवा क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंगचा वापर करत असाल तर ऑनलाइन टाळण्यासाठी काय करायला हवे, ते जाणून घ्या.
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Online Safety Tips)
- वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा – कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती व बँक खात्याशी संबंधित माहिती सांगू नये. पिन, पासवर्ड, ओटीपी कोणाशीही शेअर करू नये.
- बनावट ॲप डाउनलोड करणे टाळा – फोनमध्ये आपण सर्रासपणे कोणतेही ॲप डाउनलोड करतो. मात्र, प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोर वगळता थर्ड पार्टी साइटवरून ॲप डाउनलोड करू नये. तसेच, बनावट लिंकवर देखील क्लिक करणे टाळावे. अन्यथा, तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती चोरी होऊ शकते.
- मजबूत पासवर्ड – तुम्ही फोनमध्ये नेट बँकिंग, यूपीआयशी संबंधित ॲप वापरत असाल तर अशावेळी मजबूत पासवर्डचा वापर करावा. तुमचा ईमेल आयडी, सोशल मीडिया अकाउंट आणि बँकिंग ॲपचा पासवर्ड वेगवेगळा असावा. तसेच, सुरक्षेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.
- बँक खाते नियमित तपासा – फसवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता तुमचे बँक खाते नियमित तपासा. तुमच्या नकळत जर बँक खात्यातून व्यवहार झाले असल्यास त्वरित याबाबत बँकेला माहिती द्यायला हवी.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास काय करावे?
तुमची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित याबाबत बँकेला माहिती द्यावी. तसेच, बँकेला क्रेडिट/डेबिट कार्ड बंद करण्यास सांगावे. याबाबत पोलिसात देखील तक्रार दाखल करावी. बहुतांश प्रकरणात लवकरात लवकर तक्रार दाखल केल्यास पैसे परत मिळतात.