एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण चक्काजाम! एसटी बंद! मुख्यमंत्र्यांना आता जाग आली! आज चर्चा करणार

मुंबई- महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी 2021 मध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते, भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सदा खोतांच्या नेतृत्वाखाली तब्बल 5 महिने चक्काजाम आंदोलन केले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे ही मागणी होती. त्यावेळी उध्दव ठाकरे सरकार हतबल झाले, पण देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही सत्तेवर आल्यावर एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ. मात्र ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. यासाठी भाजपा संघटना, शिंदे गट संघटना व सदावर्ते संघटना सोडून इतर 11 संघटनांनी त्याच मागणीसाठी आजपासून पुन्हा संप पुकारत एसटी बंद केली.
लाखो प्रवाशांना खेड्या-पाड्यात घेऊन जाणाऱ्या लालपरीची चाके थांबली. संपाची नोटीस देऊन 14 दिवस झाले तरी सरकारने दुर्लक्ष केले. पण आज संपामुळे ऐन गणेशोत्सवात एसटीची सेवा ठप्प झाल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगार संघटनांबरोबर बैठक घेतली. परंतु ती निष्फळ ठरली. कारण उद्या मुख्यमंत्री नक्की भेटतील इतकेच आश्वासन त्यांनी दिले. एसटी शंभर टक्के बंद झाल्याचे पाहून खडबडून जागे झालेले मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या सायंकाळी 7 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. यामुळे उद्याही एसटी बंद राहणार आहे. विशेष म्हणजे, मागील संपावेळी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमधील विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या
चर्चेत कुठेही नव्हते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक देण्यात यावा, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे, मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांच्या वाढीऐवजी 5 हजार रुपयांचे समान वाटप करावे या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. त्या मान्य कराव्या अशी मागणी एसटी कामगारांच्या 11 संघटनांच्या एसटी कर्मचारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर 14 दिवसांची संपाची नोटीस दिल्यावर 7 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कामगारांची बैठक बोलावली. त्यात 8 दिवसांनी म्हणजे 20 ऑगस्टला बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारने दिले. मात्र, लेखी आश्वासन देऊनही ही बैठक झालीच नाही. आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीत त्यांनीही उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन देतो, असे सांगितले. परंतु आधीच्या लेखी आश्वासनाने पालन केले नाही. तर आता त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल करीत एसटी कामगार संघटनांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला.
या संपाविरोधात महामंडळ कामगार न्यायालयात गेले होते. त्यांनी आंदोलनाला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने एसटी कामगारांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने एसटीच्या बहुसंख्य आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. या आंदोलनात 60 हजार कामगारांनी सहभाग घेतला आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर यांची राष्ट्रीय एसटी कर्मचारी सेना आणि भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सदा खोत यांच्या सेवाशक्ती संघटनेने आंदोलनाला विरोध केला होता. मात्र आंदोलन यशस्वी झाले हे आज लक्षात आल्यावर या दोन्हीही संघटना उद्यापासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. कामगारांना पगारवाढ घोषित केली जात नाही तोपर्यंत चक्काजाम करण्याचा आदेश पडळकर यांनी स्वतःच्याच सरकार विरोधात दिला आहे.
एसटी कामगारांच्या मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे.
एसटी कामगारांनी आज डेपोमध्ये काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाबाबत कामगार म्हणाले की, गेले सहा महिने आमच्या मागण्या मान्य करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांना करत आहोत. आम्हाला न्याय हवा आहे. गेले सहा महिने टोलवाटोलवी सुरू आहे. तुटपुंजा पगार दिला जातो. त्यात घर चालत नाही. एसटी कर्मचारी कर्जामध्ये आहेत. कर्ज फेडण्यासाठी त्यांना ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागतो. त्यासाठी पगार कापला जातो. पुन्हा कर्ज घ्यावे लागते. पगार कमी आणि त्यात कर्जाचा डोंगर असताना संसाराचा गाडा कसा चालवायचा? 2500 ते 5 हजार रुपये पेन्शन दिली जाते. इतक्या कमी पेन्शनमध्ये घर कसे चालवायचे? आजारपणाचा खर्च कसा करायचा? इतर व्यवस्थापनात कामगारांच्या कामाची वेळ ठरली असते. आमचा कामगार कामावर गेला की घरी कधी परत जाईल हे कोणालाच माहीत नसते. गणेशोत्सवाला कोकणात जाणारा कामगार आता उत्सव संपल्यावरच परत येणार आहे. मात्र, आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
संपाबाबत चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगारांसोबत आज दुपारी बैठक घेतली. गणेशोत्सव सुरू होणार असल्याने कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन सामंत यांनी केले. हे आवाहन करताना सरकारने इतके दिवस चर्चेला का बोलावले नाही या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. आता उद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उद्या बैठक बोलावली आहे. सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव आला आहे, नागरिकांना खरेदीसाठी जावे लागते. त्यांना त्रास होऊ नये. आज राष्ट्रपती महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनी संप करू नये. सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवले आहेत. एसटी कामगारांचाही प्रश्न चर्चेतून सुटेल. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, एसटी कामगारांच्या मागण्या सहज सुटणाऱ्या आहेत. सरकारने ते प्रश्न त्वरित सोडवावेत. संप फार काळ लांबवू नये. सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका.
फडणवीसांच्या दाव्याचे काय झाले?
एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि एसटीचे विलीनीकरण करावे यासाठी 2022 मध्ये साडेपाच महिने संप झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अनिल परब परिवहन मंत्री होते. त्यावेळी पगार वाढवून देण्यास सरकार तयार होते, पण एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याची सरकारची भूमिका होती. यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार असते तर विलीनीकरण केले असते. तुम्हाला जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा. आमचे सरकार आल्यावर एसटीच्या विलीनीकरणसह कामगारांची पगारवाढ करू, असा दावा केला होता. राज्यात गेले दोन वर्षे महायुतीचे सरकार सत्तेत आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत सरकारने एसटी कामगारांचा प्रश्न सोडवलेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top