एसटीची भाडेवाढ लागू, प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ

ST Bus Ticket Price: सरकारकडून मागील काही महिन्यांपासून एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात होता. अखेर सरकारकडून एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) एसटीच्या तिकीट दरात 14.95 वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. महामंडळाच्या तिकीट दर वाढीच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजूरी देण्यात आली.

महामंडळाकडून शेवटची दरवाढ 2021 मध्ये करण्यात आली होती. कार्यकारी खर्च, इंधनाचे वाढते दर यांत्रिकी आणि उपकरणांच्या वाढलेल्या खर्चामुळे तिकीट दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते. महामंडळाकडे जवळपास 15000 बसचा ताफा आहे. यामध्ये सामान्य, अर्ध-लक्झरी आणि लक्झरी सेवेचा समाविष्ट आहे. महामंडळाच्या बसमधून दररोज 55 लाख नागरिक प्रवास करतात.

या तिकीट दरवाढीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसणार आहे. महामंडळाच्या बसचा प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण ग्रामीण भागातील नागरिकांचे आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘महामंडळाला दरमहिन्याला जवळपास 90 कोटींचा तोटा होत आहे. असे असले तरीही ज्येष्ठ नागरिक व महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचा आमचा प्रयत्न असेल.’

नवीन तिकीट दरवाढीनंतर आता प्रवाशांना दर सहा किमीमागे 1 रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.