मुंबई – महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या परीक्षेच्या वेळापत्रकात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून बदल केला आहे. ‘महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ५ जानेवारी ऐवजी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षा २ फेब्रुवारी ऐवजी आता ४ मे रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करता यावे यासाठी वेळापत्रक बदल करण्यात आला आहे. यानुसार ‘महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ व ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’साठी विद्यार्थ्यांना २६ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ६ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.