‘एनआयए’ची पाच राज्‍यांमध्‍ये छापेमारी! भिवंडी, अमरावतीतून दोन जण ताब्यात

मुंबई – एनआयएने आज दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मद संबंधित पाच राज्‍यांमध्‍ये कारवाई केली. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अमरावती आणि भिवंडीत छापेमारी करून दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.
दोन महिन्‍यांपूर्वी एनआयएने जैश-ए-मोहम्‍मदशी संबंधित शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी उर्फ ​​अयुबी याला अटक केली होती. त्यावेळी अनेक संशयितांची चौकशी केली होती. त्यातून माहिती मिळाल्यानंतर आज पाच राज्‍यांतील १९ ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएच्या टीमने छापेमारी केली. यात पहाटे साडेतीन वाजता ३५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून राजापेठ पोलीस ठाण्यात तरुणाची चौकशी केली जात आहे.
एनआयएच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतच्या हद्दीतही छापा मारून ककामरान अन्सारी या तरुणाला ताब्यात घेतले. भिवंडीत वर्षभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे. काही महिन्यापूर्वी भिवंडी तालुक्यातील पडघा – बोरिवली गावातून ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ६ ते ७ जणांना अटक केली होती. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात आहेत का, याची आता कसून चौकशी सुरू आहे.