कोल्हापूर- गेल्या तीन दिवसांपासून ऊसाच्या दरासाठी ‘आंदोलन अंकुश’ या संघटनेने शिरोळ तहसील कार्यालयासमोर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला अर्जुनवाडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठींबा देऊन धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी अर्जुनवाडचे रघुनाथ पाटील गुरुजी यांनी सांगितले की, आत्तापर्यंत कधीही कारखाण्याची ऊस तोडीची क्रमपाळी चावडीमध्ये लावली नव्हती. ती यावर्षी लावली गेली आहे. तसेच आमच्या गावात यावर्षी प्रथमच ऊस तोडीसाठी कारखाण्यांची जादा यंत्रणा लावलेली दिसत आहे. उसाला परवडणारा दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या आंदोलनास पाठींबा देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शिरोळ तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु होते. यावेळी ‘आंदोलन अंकुश’ चे संस्थापक धनाजी चुडमुंगे, माजी सरपंच शिवाजी म्हैशाळे उद्धव मगदूम, संजय चौगुले, प्रकाश झाबरे, आण्णा खोत, वसंत नरदे, बापुसो झांबरे, संपत मोडके, महेश जाधव, संभाजी माने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.