उध्दव ठाकरेंना ‘मुख्यमंत्री’ होऊ द्या! राऊतांच्या मागणीने मविआत खळबळ

मुंबई – लोकसभा निवडणूक एकत्र लढवून महाराष्ट्रात लक्षणीय यश कमावणार्‍या महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून आताच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आज उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांनी हा विषय उपस्थित करत महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. कारण जनता बिनचेहर्‍याची मविआ स्वीकारणार नाही, असे वक्तव्य केले. त्याला जोड देत उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून काम लोकांनी पाहिले आहे, असे म्हणून अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले. राऊत यांच्या मतप्रदर्शनानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआमध्ये खळबळ माजली असून, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी याच्याशी असहमती दर्शवल्यामुळे मविआत यावरून आगामी काळात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुढील चार महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीसारखे यश मिळवायला मविआ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याबाबत वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज संजय राऊत यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत, पण मुख्यमंत्रिपदाचा काय फॉर्म्युला असणार आहे? ज्याच्या जागा जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे काही ठरले आहे का? त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याशिवाय निवडणूक लढवणे धोक्याचे ठरेल, बिनचेहर्‍याची मविआ आणि बिनचेहर्‍याचे सरकार जनता स्वीकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचे काम महाराष्ट्राने पाहिले आहे. ते लोकांना आवडले आहे. त्यांच्या नावानेच लोकसभेत मविआला मतदान झाले आहे. ही गोष्ट वेगळी की, घटक पक्षांचेही त्यात योगदान आहे.
या उत्तरातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केले असले तरी यामुळे मविआतील नेत्यांकडून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, याविषयी चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आधी एकत्र बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवले जाईल. याबाबत जो निर्णय असेल तो चर्चा करून घेतला जाईल. महायुतीला पराभूत करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही त्यांच्या सुरात सूर मिसळत म्हणाले की, महायुतीला हरवणे हे महाविकास आघाडीचे पहिले लक्ष्य आहे. महायुतीला सत्तेवरून खाली खेचायचे आहे. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल, हे आम्ही बसून ठरवू. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने यावर चर्चा करणे थांबवले पाहिजे. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच निवडणुका लढवणार आहोत. मुख्यमंत्री कोण, यावर आम्ही चर्चा करत नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोण, हा विषय महत्त्वाचा नाही. शिवाय याबाबतचा निर्णय मविआच्या बैठकीत घेतला जाईल. तर यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी यावरून मविआवर टीका केली. संजय राऊत यांनी जरी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केले असले तरी मविआत सध्या काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे राऊत यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top