उध्दव ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का अजित पवारांकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह

नवी दिल्ली – आज महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला. केवळ आमदारांनी संख्या कुणाची जास्त या एका निकषावर ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर महिनाभरातच याच आमदारांच्या संख्येचा निकष ग्राह्य धरून शरद पवार यांनी स्थापन करून जोपासलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचे आहे, असा निर्णय त्याच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. यानंतर अजित पवार गटाने राज्यभरात जल्लोष केला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले तर शरद पवार यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली. ऐन लोकसभा निवडणुकीआधी आलेला हा निकाल शरद पवारांसाठी मोठा राजकीय धक्का आहे. स्वतंत्र पक्षासाठी नाव आणि तीन पर्याय आयोगाला देण्यासाठी शरद पवारांना उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांनीही केंद्रीय निवडणूक आयोगात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. निवडणूक आयोगात गेल्या सहा महिन्यांमध्ये 10 हून अधिक वेळा सुनावणी झाली. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील 41 आमदार, नागालँडमधील 7 आमदार अजित पवारांच्या बाजूनी आहेत. लोकसभेचे 2 खासदार अजित पवारांच्या बाजूनी आहेत. एका खासदाराने दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिले. राज्यातील 5 आमदारांनीही दोन्ही बाजूनी प्रतिज्ञापत्र दिले. या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.
शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उद्या 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यं शरद पवार गटाला स्वतंत्र पक्षासाठी नाव आणि चिन्हासाठी तीन पर्याय आयोगाला देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. शरद पवार गटाने संघटनात्मक बहुमत असल्याचा दावा केला, पण शरद पवार गटाच्या दाव्यातील वेळेच्या बाबतीत गंभीर विसंगतीमुळे त्यांच्या दाव्यावर विश्‍वासार्हता निर्माण झाली, असे आयोगाने निकालात म्हटले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठीच्या निवडणुकीची महत्त्वाची कालमर्यादा लक्षात घेऊन, शरद पवार गटाला उद्यापर्यंत स्वतंत्र पक्षासाठी नाव आणि चिन्हासाठी तीन पर्याय आयोगाला देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
निकालानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली की, अदृश्य शक्तीचे हे यश आहे. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडूनच तो काढून घेणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असेल. पण आम्हाला आश्‍चर्य वाटत नाही. जो निकाल शिवसेनेच्या बाबतीत दिला, तोच राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला. मराठी माणसांकडे असलेले दोन राजकीय पक्ष अशा पद्धतीने काढून घेण्यात आले. शून्यातून सुरू केलेला पक्ष काढून घेतलेला आहे. आमदारांच्या संख्येच्या आधारे निकाल दिला आहे, पण आमदार पक्ष ठरवत नाही, जनता ठरवते. आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. इतकी वर्षे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. निवडणूक आयोगाने दबावाखाली दिलेला हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.
शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील म्हणाले की, आमदार कुठेही गेले तरी पक्ष त्यामागे जात नाही, असे
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तरीदेखील निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला. शरद पवारांनी हा पक्ष शून्यातून निर्माण केला. आज तोच पक्ष पवार साहेबांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू. तीच आमची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय या निर्णयाला स्थगिती देईल अशी आमची भाबडी अपेक्षा आहे.
अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय देत भारतीय लोकशाहीवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावेल.
अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील म्हणाले की, न्याय मिळाला याचा आनंद आहे. पक्ष, चिन्ह आणि झेंडा या तिन्ही गोष्टींचा संपूर्ण अधिकार अजित पवार यांना दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयासंदर्भात आभार. 2019 पासूनच मी प्रतोद म्हणून काम करत आहे. पक्षादेश म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीकरिता मी व्हीप बजावेन.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित पवारांचे अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाचा निकाल संविधानाप्रमाणे असतो. मतदारांची संख्या ज्या गटाकडे अधिक असते त्या गटाच्या बाजूने निकाल दिला जातो.
आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो आमची बाजू खरी आहे. आमच्याकडे बहुमत आहे. या प्रश्नावर सुनावण्या झाल्या. अभिषेक मनु संघवी, कपिल सिब्बल, मुकूल रोहोतगी, मनिंदर सिंह, देवदत्त कामत यांच्या सारख्या मोठ्या वकिलांनी दोन्हीकडच्या बाजू मांडल्या. आम्ही पुराव्यासह आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली होती. कागदोपत्री पुरावे दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला, असे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल
यांनी सांगितले.
लोकशाहीत बहुमताला प्राधान्य -अजित पवार
लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असत. आम्ही निवडणूक आयोग समोर आमची बाजू मांडली. आमच्याकडे बहुसंख्य लोकप्रतिनिधी व कार्यकारिणीतील सदस्य असल्याचे पुराव्यानिशी निवडणूक आयोगाला दाखवून दिले त्यामुळेच निवडणूक आयोगाने आमच्या बाजुएन निकाल दिला. निवडणूक आयोगाचा हा निकाल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच बरोबर कुणी कितीही टीका करो आम्ही काम करणारे लोक आहोत केंद्राच्या लोकहिताच्या योजना महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे त्यामुळे ध चा मा करणार्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही असेही अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजित पवार गटाकडून जल्लोष
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूनी निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष केला. सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे फोटो हातात घेऊन ढोलताशे वाजवून तर काही ठिकाणी मिरवणुका काढून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. अजित दादांचे सर्व समर्थक निकालानंतर रस्त्यावर उतरले होते.
निवडणूक आयोगाचा
निर्णय योग्यच-मुख्यमंत्री

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मेरिटवर दिले आणि अजित पवारांच्या पक्षाच्या बाबतीत जो निर्णय झाला तोही मेरिटवरच झालेला आहे. त्यामुळे तो योग्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शरद पवार हाच आमचा पक्ष
हेच आमचे चिन्ह- आव्हाड

आमची कायदेशीर बाजू आजही मजबूत आहे. परंतु सर्व काही वरून फिरते आहे. त्यामुळे हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. पण शरद पवार हे राखेतूनसुद्धा उभे राहू शकतात. त्यामुळे शरद पवार हाच आमचा पक्ष, हेच आमचे चिन्ह आहे, असे जितेंद्र आव्हाड
यांनी सांगितले.

अजित पवारांसोबत

महाराष्ट्रातील आमदार – 41
नागालँडमधील आमदार – 7
झारखंड आमदार – 1
लोकसभा खासदार – 2
महाराष्ट्र विधानपरिषद – आमदार 5
राज्यसभा खासदार – 1

शरद पवारांसोबत
महाराष्ट्रातील आमदार -15
केरळमधील आमदार -1
लोकसभा खासदार -4
महाराष्ट्र विधान परिषद – 4
राज्यसभा – 3

(5 आमदार, 1 खासदार दोन्ही गटाच्या बाजूनी)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top