मुंबई- राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. या अपयशामुळे तरुण मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, असे असले तरी समाजमाध्यमांवर तरुण मनसैनिकांनी राज ठाकरे यांना आपले समर्थन कायम ठेवले आहे. सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी मनसेला पाठिंबा देताना राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे, ‘ठाकरे ब्रँड टिकविण्यासाठी दोघांनीही एकत्र यायलाच हवे’, ‘दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे’, ‘बाळासाहेबांच्या विचार असलेल्या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे’, अशा पोस्ट राज समर्थकांनी केल्या आहेत. याशिवाय, काही हरकत नाही साहेब, आम्ही मनसैनिक आहोत. सत्तेची गरज नाही, तू आभाळ!, आम्ही आयुष्यभर तुमच्यासोबत कट्टर राहू, अशाही प्रतिक्रिया पोस्ट पाहायला मिळत आहेत. तर १५०० रुपयासाठी मराठी माणसाची मते फिरवली, अशी टीकाही काही जणांनी केली आहे.