उद्धव ठाकरेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आदेश फडणवीसांनीच मला दिला! सोमय्यांचा गौप्यस्फोट

मुंबई – भाजपाने उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडली आणि अनेक पक्ष फोडून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढल्याने भाजपाबद्दल अनेक जणांना रोष असतानाच भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करीत म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनीच मला उद्धव ठाकरेंशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढण्याचा आदेश दिला होता. सुरुवातीला मी तसे करण्यास नकार दिला. मात्र हा पक्षाचा आदेश आहे असे त्यांनी मला बजावले आणि मला काम करायला लावले.
किरीट सोमय्या यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत उबाठा सेनेची सत्ता असताना पालिकेतील घोटाळे बाहेर काढण्याचा आदेश भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांना दिला. यावर किरीट सोमय्या यांनी फडणवीस यांना म्हटले की, मी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढतो. मात्र ठाकरे कुटुंबाला यापासून आपण दूर ठेवूया. पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यास देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील आमचे नेते यांनी मान्यता दिली. मात्र त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाशी संबंधित पालिकेतील घोटाळेही काढलेच पाहिजेत, हा पक्षाचा आदेश आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांना बजावले. किरीट सोमय्या म्हणाले की, मी भाजपाचा शिस्तीचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला जो जो आदेश दिला तो तो मी पाळत गेलो आहे. हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार असो किंवा मातोश्री संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे असो, पक्षाने आदेश दिल्याने मी संशोधन केले आणि एक एक प्रकरणे बाहेर काढली.
राज्यामध्ये मविआचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी नेत्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली होती. या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांच्यावर कारवाई होईल यासाठी पुरेपूर प्रयत्नही केला. किरीट सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबवण्याचा कट रचला होता. त्यावेळी मी आक्रमक होऊन त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली नसती तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी मिळून भाजपा पक्ष संपवला असता. भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात डांबले असते. त्यामुळेच मी त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून त्यांना रोखण्यात यशस्वी झालो. माझ्यावर वाशिम
मतदारसंघात भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर अमित शहा यांचा फोन आला, त्यांनी माझी चौकशी केली आणि लगेचच मला सुरक्षा पुरवली. माझ्या कामाची हीच पोचपावती आहे. किरीट सोमय्या यांच्या या मुलाखतीमुळे महाराष्ट्रात खळबळ माजणार हे निश्‍चित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top