उद्घाटनानंतर 14 महिन्यांतच ‘समृद्धी’वर जीवघेणा खड्डा

छत्रपती संभाजीनगर – 55,000 कोटी खर्चून बांधण्यात येत असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन 14 महिने होत नाहीत तोवर त्यावर मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावनजीकच्या पुलावर हा खड्डा पडला आहे. महामार्गाजवळून शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, हे लक्षात आल्याने लगेच त्याची दुरूस्ती हाती घेण्यात आली.
नागपूर ते मुंबई दरम्यानचे सुमारे 800 किलोमीटरचे अंतर जोडणार्‍या ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, भरवीर-इगतपुरी या तिसर्‍या टप्प्याचे लोकार्पण सोमवारी होणार आहे. इगतपुरी आमणे या चौथ्या टप्प्याचे बांधकाम अजून चालू आहे. या महामार्गामुळे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासांत पार करणे शक्य होणार आहे. परंतु तो पूर्ण होण्यापूर्वीच महामार्गावर खड्डे पडू लागल्याने आश्चर्य केले जात आहे.
आधीपासूनच इथे होणार्‍या अपघातांमुळे या महामार्गाला ‘मृत्यूचा हायवे’ म्हटले जाते. उद्घाटन झाल्यापासून पहिल्या नऊ महिन्यांतच या महामार्गावर 1282 अपघात होऊन 135 जण मृत्युमुखी पडले होते. वाहनचालकांना हायवेच्या संमोहनाचा होणारा त्रास, लेन कटिंग, टायर बस्टिंग, ओव्हर स्पीडिंगसारख्या चुकांमुळे हे अपघात होत असल्याचे सांगितले जात असले तरी या सुरुवातीपासूनच या महामार्गाच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. महामार्गावरील प्रवासी सुविधांचा अभाव हेदेखील समृद्धी महामार्गावर वारंवार होणार्‍या अपघातांचे एक कारण मानले जात आहे. त्यातच आता या महामार्गाला खड्डे पडण्यास सुरुवात झाली असल्याने या महामार्गाचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे, हे दिसून येत आहे.
महामार्गावर खड्डे पडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर सरकारवर आरोप करत म्हटले की, पंतप्रधानांना बोलावून समृद्धीचा घाईघाईने उद्घाटन करण्यात आले. समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या. मोठमोठे अपघात
झाल्यावरसुद्धा उपाय-योजनाची आवश्यकता होती. केलेले काम घाईघाईत केले. ते निकृष्ट दर्जाचे होते हे समोर आले आहे. तेव्हा बोंबाबोंब झाली आणि आज प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला, हे जनतेला कळले आहे. समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्ले गेले. कंत्राट देताना समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधार्‍यांनी आपल्या खिशात घातले.
आता समृद्धीवर गाडी खाली जाऊ नये म्हणून चारही बाजूंनी 700 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2,400 कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी संरक्षण वायर लावली जाणार आहे. विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी टेंडर काढले गेले आहे. आता मलिदा खाल्ल्यामुळेच खड्डे पडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top