जयपूर – देशात उन्हाळ्याची सुरुवात झाली असून उत्तरेतील अनेक भागात पारा वाढला आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पुढील ११ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानच्या १४ जिल्ह्यांमध्येही हा इशारा देण्यात आला असून बाडमेर, जैसलमेरमधील पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला.राजस्थानमध्ये पुढील काही दिवस पारा चढाच राहणार असून देशाच्या सर्वच भागात तीव्र उन्हाळा सुरु झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. राजस्थानहून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे, मध्य प्रदेशातही उष्णता वाढली आहे. मध्य प्रदेशातील नीमच, मंदसौर, भिंड, मुरैना, श्योपूर आणि रतलाम येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्येही पारा चढाच राहणार आहे.दिल्लीतही ३८ अंशापर्यंत पारा गेला आहे. उत्तरेत उन्हाळ्याच्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना आज केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, मेघालय आणि अंदमान-निकोबारमध्ये पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडला. आंध्र आणि ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मणिपूरच्या काही भागांमध्ये गारपीट झाली.
