ई-बाईक टॅक्सी धोरणाला रिक्षा संघटनांचा विरोध

मुंबई – तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणार अशी घोषणा करीत टॅक्सी , रिक्षा , खाजगी वाहने यांना डावलून राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने याला विरोध केला आहे. कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत राव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठविले असून समितीला विश्वासात न घेता बाईक टॅक्सी धोरण राबवल्यास बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी कृती समितीने राज्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या नेत्यांची २७ एप्रिल रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. ई-बाईक टॅक्सी धोरणाची चाचपणी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीशी झालेल्या बैठकीतही कृती समितीने या धोरणाला कडाडून विरोध केला होता.
मुंबई महानगर प्रदेशात साडेचार लाखांहून जास्त तर संपूर्ण राज्यात सुमारे १२ लाख रिक्षाचालक व्यवसाय करत आहेत. ही संख्या जास्त असल्यामुळे आधीच हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे.अशा परिस्थितीत जर ई-बाईक टॅक्सी धोरण राबवल्यास परिस्थिती गंभीर होईल,असा इशारा कृती समितीने दिला होता