बारामती – राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्या मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांच्यावर विरोधी राष्ट्रवादी पक्षात असताना भाजपाचे किरीट सोमय्या यांनी 125 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ईडीने त्यांच्या घरावर, उद्योगांवर एकामागे एक इतक्या वेळा धाडी घातल्या की, शेवटी त्यांच्या पत्नी कॅमेर्यासमोर रडत धाडी थांबवा, अशी विनंती करीत राहिल्या. आता भाजपाच्या मित्रपक्षात प्रवेश केलेले तेच हसन मुश्रीफ कोल्हापुरात नवे भव्य हॉस्पिटल आणि बँक सुरू करणार असून, त्याच्या भूमिपूजनासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात 20-21 जुलैला येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आज दिली.
बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा पहिला जनसन्मान महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना अजित पवार यांनी काल दिल्लीत झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच्या भेटीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, शहा यांच्याकडे आम्ही साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी लेखी निवेदन द्या, असे म्हटले. ते निवेदन आम्ही उद्याच त्यांना पाठवणार आहोत. या भेटीवेळी शहा म्हणाले की, येत्या 20-21 जुलैला मी महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार आहे. बारामतीत हजार फुटांचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचे हॉस्पिटल आहे, तसे कोल्हापुरात एक चांगले हॉस्पिटल हसन मुश्रीफांचे तयार होत असून, त्याचे भूमिपूजन, बँक आणि इमारत यांचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचे आमंत्रण मी स्वीकारेन, परंतु तिथे 10,000 झाडे लावण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे, अशी अट मी घातली आहे.
आज बारामतीला झालेल्या जनसन्मान मेळाव्यातून अजित पवार यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यभर असे जनसन्मान मेळावे होतील असे जाहीर करीत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मात्र त्याचवेळी आम्ही सत्तेसाठी हापापलो नाही असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या मेळाव्याला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, खासदार सुनेत्रा पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात भाषण करताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जनसन्मान’ रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत. हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपर्यात जाऊन सर्व जनतेसमोर मांडणार आहोत. लोकसभेत आपल्याला अपयश आले. परंतु त्याने खचून जायचे नाही आणि कालच्या विधान परिषद निवडणुकीत यश आले म्हणून हुरळून जायचे नाही. यश पण पचवायला शिकले पाहिजे आणि नव्या उमेदीने लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, महिलांकरिता ‘लाडकी बहीण योजना’ आणली, त्यावेळी माझ्यावर टीका झाली. मी त्यांना फार महत्त्व दिले नाही.आता चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. महिलांना तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. माझ्या शेतकर्यांना वीज मोफत देत आहे. शेतकर्यांनो आता चांगले धान्य पिकवा. एक रुपयात पीकविमाही देत आहोत. एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले आहेत. सत्ता ही पदे उपभोगण्यासाठी नसते म्हणून सर्व समाजघटकांतील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 75 हजार कोटी रुपये राज्यातील विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरीब जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवला आहे. या योजना राबवण्यासाठी महायुतीला निवडून देण्याची गरज आहे. आता हवशे-नवशे-गवशे येऊन योजना चुकीची कशी आहे, ते सांगतील. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
विधानसभा मतदान होईपर्यंत ही जनसन्मान रॅली थांबणार नाही. संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पावसाची हजेरी हा शुभसंकेत?
राष्ट्रवादीचा मेळावा चालू असताना पाऊस होत होता. त्यामुळे नेत्यांनी भाषणे आटोपती घेतली. अजित पवार यांनी भरपावसात भाषण केले. ते म्हणाले की, या मेळाव्याला वरुण राजानेही आशीर्वाद दिला आहे. हा शुभ संकेत आहे. शरद पवारांनी पावसात भाषण केल्यानंतर त्यांना प्रचंड यश मिळाल्याने पावसात भिजत भाषण केल्यास निवडणुकीत विजय मिळतो, असा समज गेले काही दिवस महाराष्ट्रात आहे. त्याचा संदर्भ अजितदादांच्या बोलण्याला होता. परंतु गेल्या निवडणुकीत पावसात भिजूनही पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यामुळे पावसात भिजणे हा शुभ संकेत आहे की नाही हे आगामी निवडणूकच ठरवेल.