भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा अंतराळात इतिहास रचला आहे. ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (स्पेडेक्स) अंतर्गत उपग्रहांची यशस्वीपणे ‘डॉकिंग’ (ISRO Docking In Space) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडून इस्त्रोने इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने अशी कामगिरी केली आहे.
इस्त्रोने या मोहिमेची माहिती देताना एक्सवर (ट्विटर) लिहिले की, गुड मॉर्निंग इंडिया, इस्रोने स्पेडेक्स मोहिमेत ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळवलं आहे. या क्षणाचा साक्षीदार असल्याचा देशाला अभिमान वाटतो.
पंतप्रधान मोदींनी देखील या ऐतिहासिक कामगिरीसाठी इस्त्रोला शुभेच्छा दिल्या. मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, अंतराळात उपग्रहांच्या डॉकिंगच्या यशासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि पूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन. हा भारताच्या आगामी महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) काय आहे?
स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या मोहिमेंतर्गत उपग्रहांना अतंराळात ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्यात आले. म्हणजेच, अंतराळात दोन यानाला एकमेकांशी जोडणे व पुन्हा वेगळे करणे. या मोहिमेंतर्गत चेझर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) नावाच्या दोन उपग्रहांचे 30 डिसेंबरला प्रक्षेपित करण्यात आले.
भारताने अंतराळासंबंधित अनेक योजना आखल्या आहेत. अंतराळात स्पेस स्टेशनची निर्मिती, अंतराळवीरांना चंद्रांवर पाठवणे यासारख्या मिशनसाठी स्पॅडेक्स मिशन यशस्वी होणे महत्त्वाचे होते. अंतराळात डॉक व अनडॉक प्रक्रिया पार पाडणे अवघड असते. हे मिशन भारत कमी खर्चात पूर्ण करू शकल्यास ही मोठी कामगिरी असेल. भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील खर्च देखील यामुळे कमी होईल. ही मोहीम यशस्वी झाल्याने अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा जगातील चौथा देश ठरला आहे.