इस्रोच्या प्रोबा-3 मोहिमेत कृत्रिम सूर्यग्रहण घडवणार

नवी दिल्ली – सूर्याच्या रहस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी कृत्रिम सूर्यग्रहण साकारण्याची मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या संयुक्त विद्यमाने प्रोबा-3 मधून आखण्यात आली आहे. भारतातल्या श्रीहरीकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे 4 डिसेंबरला पहाटे 4.08 वाजता यासाठी दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या मोहिमेने पहिल्यांदाच आकाशात कृत्रिम सूर्यग्रहण घडवले जाणार असल्याने अंतराळ संशोधनात हा प्रयोग मैलाचा दगड ठरेल.
सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असते. ती कृत्रिमरित्या साध्य करण्यासाठी दोन उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. हे दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 44 मीटरचे अंतर राखून एकत्र फिरतील. ते फिरताना अशा काटकोनात एकमेकांसमोर येतील की, पहिल्या उपग्रहाची सावली दुसर्‍या उपग्रहावर पडून सूर्य झाकला जाईल. त्यामुळे सूर्यग्रहणाचा अनुभव येईल. यासाठी अत्त्युच्च अचूकता लागते. दोन्ही उपग्रह एक मिलीमीटरने जरी आपल्या कक्षेपासून भरकटले तरी सूर्यग्रहण घडवले जाऊ शकत नाही. आपल्या नखाच्या जाडीएवढे हे अंतर आहे.
शास्त्रज्ञ सूर्यग्रहणाच्या वेळी अग्निकंकण (रिंग ऑफ फायर)चा अभ्यास करायला उत्सुक असतात. यासाठी शास्त्रज्ञांना सूर्यग्रहणाचा अक्षरशः पाठलाग करावा लागतो. इतके करूनही केवळ एक मिनिटापुरते त्याचे दर्शन घडते. तर काही वेळेला ढगांच्या आच्छादनामुळे तेही घडत नाही. प्रोबा-3 मुळे वर्षभरात 50 कृत्रिम सूर्यग्रहण घडवता येणार असून, प्रत्येक सूर्यग्रहणाचा कालावधी 6 तासांचा असेल. यामुळे खासकरून शास्त्रज्ञांना कोरोना म्हणजे सूर्याभोवतीच्या आवरणाचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. सूर्यापेक्षा सूर्याच्या आवरणाचे तापमान अधिक का असते याचाही वेध घेता येणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 5,500 डिग्री सेल्सियस तर बाह्य आवरणाचे तापमान 10 दशलक्ष डिग्री सेल्सियस इतके प्रचंड असते.
कोरोनाच्या अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना सौर वातावरणाविषयी भाकिते सुधारता येणार आहेत. याशिवाय कोरोनल मास इंजेक्शन म्हणजे प्लाज्मा आणि चुंबकीय क्षेत्र यांचे अंतराळात फेकले जाणे तसेच सौरवादळांचाही अभ्यास करता येणार आहे. ही सौरवादळे पृथ्वीवरील दळणवळण प्रणाली, उपग्रह आणि वीज यंत्रणेत व्यत्यय आणू शकतात. या प्रयोगाची पहिली छायाचित्रे मार्च 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top