मुंबई – राज्य विधानसभेच्या एकतर्फी निकालांमुळे ईव्हीएम यंत्राबद्दल सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील ९५ मतदारसंघांतील १०४ उमेदवारांनी व्हिव्हिपॅट पावत्या आणि ईव्हीएम यंत्रांमधील मते याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केले आहेत.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार ७५५ मतदान केंद्रांवरील मतदानाची फेरतपासणी केली जाणार आहे,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर पराभूत झालेले शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे, बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) , माजी मंत्री राजेश टोपे (घनसावंगी), हितेंद्र ठाकूर (वसई) आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर (नालासोपारा), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (संगमनेर), नसीम खान (चांदवली) यांचा समावेश आहे.