कराची- कराचीत तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी भव्य मार्चा काढून राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. मात्र पोलिसांनी अश्रुधूरच्या नळकांड्या फोडत हा मोर्चा रोखला. त्यानंतर पोलिसांनी इम्रान समर्थकांची धरपकड केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि विरोधी पक्षनेते उमर अयुब यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय समर्थकांचा मोर्चा पंजाबमार्गे स्वाबीहून इस्लामाबादला निघाला होता. अट्टोक ब्रिज, चाच इंटरचेंज आणि गाझी बरोथा कॅनॉल भागांत हा मोर्चा आल्यावर आलेल्या पीटीआय समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अश्रुधूराच्या नळकांड्या फोडला आणि त्यांचा मोर्चा अडवला. पोलिसांनी काही समर्थकांना अटक केली. त्यावेळी अली अमीन गंडापूर यांनी सांगितले की, सरकारने इम्रान खान यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकले आहे. त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आमचा मोर्चा माघारी जाणार नाही.