Infosys Lays Off: भारतातील सर्वात मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूरू कॅम्पसमधून सुमारे 700 नवीन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप केला जात आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सेनेट या संघटनेने हा आरोप केला आहे.
NITES च्या दाव्यानुसार, हे कर्मचारी काही महिन्यांपूर्वीच कंपनीत जॉइन झाले होते. परंतु. त्यानंतर त्यांची अचानक कपात करण्यात आली. तसेच, इन्फोसिसने या कर्मचाऱ्यांना गुप्तता करार करण्यास भाग पाडले, ज्यामुळे सामाजिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये माहिती लीक होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला असावा.
संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी म्हटले आहे की, धक्कादायक आणि अनैतिक पद्धतीने इन्फोसिसने अवघ्या काही महिन्यांपूर्वी जॉइन झालेल्या जवळपास 700 कॅम्पस भरती कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने कर्मचारी कमी करताना बाऊन्सर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वापर करून कर्मचाऱ्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला जात आहे.
याबाबत इन्फोसिसने स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहे. कंपनीकडून म्हटले आहे की, ‘कामावरून कमी करण्यात आलेले नवीन कर्मचारी अनेक अंतर्गत चाचण्या उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरले होते. सर्व नवीन कर्मचाऱ्यांना मूल्यांकन चाचण्यांसाठी तीन संधी दिल्या जातात. अपयश आल्यास करारानुसार, त्यांना संस्थेत पुढे काम करता येणार नाही. गेली दोन दशके हा नियम अस्तित्वात आहे.’