इंदापूर- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक अचंबित करणारी घटना घडली. निमगाव केतकी येथील जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या बाह्यवळणात अडसर बनत असलेली ३,६०० स्क्वेअर फुटांची तीन मजली इमारत चक्क मूळ जागेवरून उचलून जशीच्या तशी ७५ फूट पुढे सरकवण्यात आली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अडीच महिन्यांमध्ये सुरेश म्हेत्रे व संजय म्हेत्रे या बंधूंनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांच्या या प्रयोगाने सर्वत्र कुतूहल आणि चर्चा होत आहे.
म्हेत्रे बंधूंची २३ बाय ४३ फूट आकाराची इमारत सध्याच्या गावठाणातून जाणाऱ्या पालखी मार्गालगत आहे. मात्र, त्यांच्या इमारतीच्या मागील बाजूनेच बाह्यवळण जात असल्याने या रस्त्याच्या कामात इमारत पाडावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी ही इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी काटेवाडीत एक इमारत दहा फूट सरकवण्याचा यशस्वी झालेला प्रयोग म्हेत्रे बंधूंनी पाहिला होता. इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च असून हे काम हरियाणामधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आले होते. याबाबत बोलताना ठेकेदार मोहनलाल म्हणाले की, ही इमारत २५० जॅकच्या साह्याने व रोज ५० कामगारांच्या मदतीने सरकवण्यात आली आहे. इमारत जागेवर चार फूट उचलण्यासाठी एक महिन्याचा कालावधी गेला व पुढे ७५ फूट सरकवण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी गेला. इमारत पुढे सरकवण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. सध्या फूटिंग भरण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.