नवी दिल्ली- अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने इंडिया आघाडीतील खासदार संसद परिसरात दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही इंडिया आघाडीच्या खासदारांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे खासदार संसद भवनाच्या ‘मकर गेट’जवळ जमले. त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या खासदारांना तिरंगा झेंडे आणि गुलाबाची फुले दिली. गुलाब देतेवेळी त्यांनी “देश विकू देऊ नका.” असा संदेशदेखील दिला. या आंदोलनात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी वाड्राही सहभाग झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत जाण्यासाठी कारमधून बाहेर पडताच राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते त्यांच्यापर्यंत गेले. त्यांनी राजनाथ सिंह यांना गुलाबपुष्प आणि तिरंगा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ही भेट स्वीकारण्यास नकार दिला.
