आसामच्या चहाच्या मळ्यातील कामगारांमध्ये आढळतोय ‘हा’ जीवघेणा आजार, संशोधनात समोर आली माहिती

Assam’s Tea Garden Workers:आसाम हे राज्य चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. देशातील एकूण चहाच्या उत्पादनांपैकी जवळपास 50 टक्के उत्पादन याच राज्यात होते. मात्र, इतरांसाठी जो चहा आनंददायी, मूडफ्रेश करणारा आहे, तोच चहा आसाममधील मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी जीवघेणा ठरत आहे.

आसाममधील चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना फुफ्फुसशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या (AMCH) डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात याबाबतची माहिती समोर आली आहे. यानुसार, चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये ‘क्रॉनिक पल्मोनरी ॲस्परगिलोसिस’ (CPA) या जीवघेण्या फुफ्फुस संसर्गाचा प्रादुर्भाव आढळला आहे. हा संसर्ग खूपच धोकादायक व जीवघेणा समजला जातो.

डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात या फुफ्फुस संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासात डॉक्टरांनी आढळले की, बहुतेक रुग्णांचा क्षयरोग (TB) झाल्यानंतर ‘क्रॉनिक पल्मोनरी ॲस्परगिलोसिस’मुळे मृत्यू होत आहे.

टीबी हे ‘क्रॉनिक पल्मोनरी ॲस्परगिलोसिस’ होण्याचे प्रमुख कारण आहे. टीबीविषयी या कामगारांमध्ये जागरुकता नसल्याने हा आजार होण्याचे प्रमाण या भागामध्ये सर्वाधिक आहे. डॉक्टरांनुसार, हा आजार इतर भागातील नागरिकांनाही होऊ शकतो. मात्र, टीबीमुळे फुफ्फुस कमकुवत होतात व यामुळे हा आजार होण्याचे प्रमाण वाढते. योग्य जागरूकता आणि वेळेवर उपचार केल्यास यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.