मुंबई- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर वाढवून छेडलेल्या व्यापार युद्धाचे गंभीर परिणाम आज आशियाई भांडवली बाजारांवर झाले. भारतीय शेअर बाजारासह जपान आणि चीनच्या शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार माजला. शेअरच्या किमती जवळजवळ 8 टक्क्यांनी कोसळल्या. डॉलर महाग होऊन रुपया गडगडला. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 60 रुपये इतकी उतरली. जगभरातील अर्थतज्ज्ञांनी या भूकंपानंतर ट्रेडिंग करू नका, सोने चांदी विकत घ्या, म्युचुअल फंड मध्येच गुंतवणूक करा असा सल्ला दिला. बाजार सावरायला आणखी किमान 3 महिने लागतील असे सांगण्यात आले.
आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने तब्बल 4 हजार अंकांची गटांगळी खाल्ली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील सुमारे 1 हजार अंकांनी घसरला. कोरोना काळानंतर देशांतर्गत शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली. या घसरणीत गुंतवणूकदारांचे सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सेन्सेक्समध्ये व्यवहार सुरू होताच विक्रीमुळे हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेन्टस, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, टायटन, कोटक महिंद्रा, अल्ट्रा सिमको, मारुती आदि दिग्गज कंपन्यांचे समभाग धडाधड कोसळले. त्यामुळे सेन्सेक्स थेट 4 हजार अंकांनी घसरून 71 हजार 400 अंकांपर्यंत खाली आला. निफ्टीदेखील 1 हजार 146 अंकांच्या घसरणीसह 21 हजार 800 अंकांवर आला.
आजच्या व्यवहारांमध्ये सर्वच क्षेत्रांतील गुंतवणुकदारांमध्ये ट्रम्प धोरणाची दहशत दिसून आली. बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती या गुंतवणुकदारांना नेहमी साथ देणाऱ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली.
ट्रम्प धोरणाचा फटका खुद्द अमेरिकेलाही बसला. अमेरिकेच्या नॅसडॅकमध्ये 3.5 टक्के घसरण झाली. एस अँड पीमध्ये 3.9 टक्के तर डाऊ जोन्स 1300 अंकांची घसरण झाली. तर डाऊ जोन्स अंकांनी कोसळला. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि चीनच्या बाजारातही मोठी पडझड झाली.
जपानच्या निक्केईमध्ये 8.8 टक्क्यांची मोठी घसरण झाली. या घसरणीसह निक्केई 30,792.74 अंकांच्या दीड वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. टॉपीक्स हा जपानचा दुसरा निर्देशांकदेखील 8 टक्क्यांच्या घसरणीसह 2,284.69 अंकावर उतरला. या पडझडीमुळे जपानच्या शेअर बाजारात वायदे व्यवहार बंद करण्यात आले.
दक्षिण कोरियाचा कोस्पी 4.34 टक्क्यांनी घसरला. तर कोसडॅकमध्ये 3.48 टक्के आणि सिंगापूरच्या शेअर बाजार 7 टक्क्यांची घसरण झाली. मार्च 2020 नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली.
मलेशियाचा बाजार 4 टक्क्यांनी घसरला. ही मागील दीड वर्षांतील सर्वात मोठी पडझड ठरली.फिलिपाईन्स 4 टक्के तर तैवान मध्ये 10 टक्क्यांची पडझड झाली. चीनच्या सीएसआय300 ब्ल्यू-चीप निर्देशांक 4.5 टक्क्यांनी घसरला. तर हाँगकाँगच्या हँग सँग निर्देशांक 8 टक्क्यांनी कोसळला, अलिबाबा आणि टेनसेन्ट या दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली. चीनवर अमेरिकेने आधी 20 टक्के आणि नंतर अतिरिक्त 34 टक्के असे एकूण 54 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. त्याला जशास तसे प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकेवर अतिरिक्त आय़ात शुल्क लागू केले.
नेतन्याहू ट्रम्प यांच्या भेटीला
ट्रम्प यांच्या कर धोरणाचा सुमारे 50 देशांनी धसका घेतला असून अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख पडद्याआडून ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करून आयात शुल्क कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. आज इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानयाहू ट्रम्प यांच्या भेटीसाठी अमेरिकेला रवाना झाले. आय़ात शुल्क कमी करण्याची विनंती करण्यासाठी ट्रम्प यांची भेट घेणारे नेतन्याहू हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.
हे कडू औषध गरजेचे आहे
जगभरातील भांडवली बाजारात हांहाकार माजला असताना त्याला कारणीभूत ठरलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र आपल्या धोरणावर ठाम राहिले. कर धोरण मागे घेणार नाही , कर हे कडू औषध आहे, ते गरजेचे आहे असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. एअर फोर्स वन विमानातून फ्लोरिडातून वॉशिंग्टनला परतताना ट्रम्प यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ट्रम्प म्हणाले की, इतर देशांनी अमेरिकेला वाईट वागणूक दिली कारण आमचे नेते मूर्ख होते आणि त्यांनी ते होऊ दिले. बाजारपेठेत पुढे काय होईल मी सांगू शकत नाही. पण आपला देश आता खूप मजबूत होणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.
