‘आशिकी 3’ मधून तृप्ती डिमरीची एक्झिट

Aashiqui 3 Update: आशिका आणि आशिकी – 2 या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या नंतर निर्मात्यांकडून आशिकी – 3 ची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री तृप्ती डिमरीची निवड देखील करण्यात आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरी या चित्रपटाचा भाग नसल्याचे समोर आले आहे.

चित्रपटाच्या नावावरून आधीपासूनच वाद सुरू होते. भूषण कुमार आणि मुकेश भट हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मात्र त्यांच्यातील काही मतभेदांमुळे शूटिंग वारंवार पुढे ढकलले जात आहे. वारंवार चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत असल्याने तृप्तीने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच, काही रिपोर्टनुसार, निर्मात्यांना या चित्रपटासाठी स्क्रीनवर निरागस दिसेल अशी अभिनेत्री हवी होती, त्यामुळे तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला ही भूमिका मिळण्याची शक्यता आहे.

‘तृप्ती या चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक होती. पण आता तिच्याजागी भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जाणार आहे. आशिकी – 3 मध्ये तृप्ती बाहेर पडल्यानंतर आता या भूमिकेसाठी अभिनेत्री शर्वरी वाघची निवड केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आशिकी – 3 चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू हे करणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटातील भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्रीची वर्णी लागते हे पाहावे लागेल.