New India Co-operative Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत. तसेच, बँकेला नवीन कर्जे देणे किंवा ठेवी स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.
बँकेवर निर्बंध लादण्यात आले असले तरी ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स योजनेअंतर्गत संरक्षण मिळणार आहे. ज्यामध्ये बँक बंद पडल्यास खातेधारकांची 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहील. निर्बंध लादल्यानंतर बँकेच्या विविध शाखेबाहेर खातेधारकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
बँक नवीन गुंतवणूक किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाही. कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. याशिवाय, बँकेला आपली कोणतीही मालमत्ता विकण्याचा अधिकार नसेल. हे निर्बंध 13 फेब्रुवारी 2025 पासून सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.
बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेकडे पुरेसा निधी आहे की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांना त्यांच्या बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की हे निर्बंध ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी लादण्यात आले आहेत.
दरम्यान, बँक मागील दोन वर्षांपासून तोट्यात आहे. बँकेला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 30 कोटी 45 लाख रुपयांचा तोटा झाला होता. तर 2024 मध्ये 22 कोटी 78 लाख रुपये तोटा होता.