नवी दिल्ली – कोलकाता येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या प्रकरणातील पिडितेच्या पालकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
आरजीकर प्रकरणातील पिडितेच्या पालकांनी या प्रकरणाची पुन्हा नव्याने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली असून ही मागणी कोलकाता उच्च न्यायालयात करण्याला परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, पिडीतेचे पालक कोलकाता उच्च न्यायालयात अर्ज याचिका दाखल करु शकतात. आरजीकर महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी कोलकातासह पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
