मुंबई – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तीन कार्यालयांवर काल जीएसटी विभागाने छापे टाकले. ही छापेमारी आज दुसर्या दिवशीही सुरुच होती.जीएसटी अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सहकार्य केले असल्याचे आयसीआयसीआय बँकेने म्हटले.
आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला २७ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य कर उपायुक्तांनी नोटीस पाठवून ४२९.०५ कोटी रुपयांची जीएसटी कर भरण्याची सुचना दिली होती. या नोटीसमध्ये २०८.०२ कोटी मुद्दल, २००.२२ कोटी व्याज आणि २०.०० कोटी दंडाचा समावेश होता.महाराष्ट्र जीएसटी कायदा,२०१७च्या कलम ६७ (१)आणि (२)अंतर्गत जीएसटी अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयात ही कारवाई केली. जीएसटी विभागाने किंवा बँकेने या छाप्याचे कारण सांगितले नसले तरी जीएसटी चोरी केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.