आयफोन आणि अँड्रॉइडवर वेगवेगळे भाडे का? सरकारच्या नोटीसला ओला-उबरने दिले उत्तर

कॅब अ‍ॅग्रीगेटर्स असलेल्या ओला (Ola) आणि उबर (Uber) या कंपन्यांकडून अँड्राइड व आयफोन यूजर्सला वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणात थेट सरकारकडून ओला आणि उबरला नोटीस बजावत उत्तर मागण्यात आले होते. यावर आता ओलाने स्पष्टीकरण देत डिव्हाइसच्या आधारावर ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जात नसल्याचे म्हटले आहे.

एकच किंमत प्रणाली संपूर्ण देशात लागू आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर प्रवासासाठी वेगळे भाडे आकारले जात नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओलाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, ‘आमच्याकडे सर्व ग्राहकांसाठी समान किंमत धोरण आहे. आम्ही समान प्रवासांसाठी ग्राहकांच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर फरक करत नाही.’

यासोबतच, कंपनीने या प्रकरणातील शंका दूर करण्यासाठी कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीसोबत (CCPA) मिळून काम करणार असल्याचे आणि किंमत धोरणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हटले आहे. उबरकडून देखील अशाचप्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या फोन यूजर्सला वेगवेगळी किंमत आकारण्यात येत असल्याची तक्रार वारंवार समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) कडून कंपन्यांना ही नोटीस जारी करण्यात आली होती..

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. ‘मोबाईल मॉडेल्स च्या (iPhone/Android) आधारे किमतींमध्ये दिसणाऱ्या फरकाबाबतच्या अनुषंगाने कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीच्या माध्यमातून प्रमुख कॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटिसा पाठवून यावर स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर यावर आता ओला आणि उबरकडून उत्तर देत ग्राहकांकडून डिव्हाइसच्या आधारावर वेगळे शुल्क आकारण्यात येत नसल्याचे म्हटले आहे.