आमच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या ‘विस्तारा’च्या वैमानिकांचे टाटांना पत्र

मुंबई – टाटा उद्योगसमुहातील एअर विस्तारा या विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीतील वैमानिकांमध्ये सध्या प्रचंड रोष आहे. व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एअर विस्ताराची सुमारे दीडशे उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर एअर विस्तारामधील वैमानिकांच्या दोन मुख्य संघटनांनी टाटा समूहाच्या संस्थापकांना उद्देशून एक संयुक्त पत्र लिहिले असून आपल्या समस्या आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे.
इंडियन कमर्शियल पायलटस असोसिएशन आणि इंडियन पायलटस गिल्ड या वैमानिकांच्या दोन प्रमुख संघटनांनी हे पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी आपल्या समस्या आणि विविध मागण्या मांडल्या असून टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

टाटा समूहातील विमान सेवा क्षेत्रातील सर्व कंपन्यांमधील वैमानिकांच्या वतीने हे संयुक्त पत्र लिहिण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिली जात नाही, कारभारात पारदर्शकता नाही, वैमानिकांना सन्मापूर्वक वागणूक दिली जात नाही,अशा तक्रारी या पत्रात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वैमानिकांचे स्थायी भत्ते, रोस्टर पद्धतीमध्ये सुधारणा करणे यांसारख्या मागण्या या संघटनांनी केल्या आहेत. एकूणच टाटा समूहातील विमान कंपन्यांच्या वैमानिकांमध्ये असलेल्या नाराजीला पत्रातून वाचा फोडण्याचा प्रयत्न पत्रातून करण्यात आला आहे.

आपल्या थेट चर्चा करा,आमच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि आपल्या मागण्यांवर सहानुभुतीपूर्वक विचार करा,अशी कळकळीची विनंती य़ा पत्रातून टाटा समूहाच्या प्रमुखांना करण्यात आली आहे. रोस्टर पध्दतीतून मनमानी करीत वैमानिकांवर कारवाई करण्याच्या धमक्या देण्याच्या व्यवस्थापनाच्या दादागिरीबाबत पत्राद्वारे तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, एअर विस्तारामध्ये सुरू असलेल्या या गोंधळाच्या परिस्थितीवर नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे बारकाईने लक्ष आहे. एअर विस्तारामधील वैमानांची अपुरी संख्या आणि त्यामुळे उड्डाणे वारंवार रद्द होत असल्याची नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top