‘आप’च्या 12 ठिकाणांवर ईडीच्या एकदम धाडी दिल्ली सरकारवरच झडप! साक्षीही पुसून टाकल्या

नवी दिल्ली – बिहारमध्ये नितीशकुमारना आपल्याकडे खेचण्यात यश आल्यानंतर भाजपाने झारखंड राज्यात हाच प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर आता त्यांनी दिल्लीचे ‘आप’ सरकार पाडण्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. समन्स पाठवूनही मुख्यमंत्री केजरीवाल हाती लागत नाहीत हे लक्षात आल्यावर आज सकाळीच ईडीने धडाधड ‘आप’च्या मंत्र्यांच्या बारा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. यामुळे राजधानीत खळबळ माजली.
‘आप’चे मनीष सिसोदिया यांच्यावर झाडी टाकून त्यांना अटक केल्यानंतर ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले. केजरीवाल यांना ईडी कोणत्याही क्षणी अटक करील असे वातावरण निर्माण झाले. केजरीवाल यांनी पाच समन्स धुडकावल्यानंतर ईडीने शिक्षणमंत्री ‘आप’च्या आतिशी यांच्याकडे मोहरा वळविला. आज तर ईडीने ‘आप’ सरकारवर
झडपच टाकली.
गेले काही दिवस आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत ईडीने पाच वेळा समन्स बजावले आहेत. आपच्या नेत्या, दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांच्या घर, कार्यालयावरही ईडीने छापेमारी केली होती. आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन ईडीची पोलखोल करणार असा दावा काल आपने केला होता. ही पत्रकार परिषद होण्यापूर्वीच सकाळी सात वाजल्यापासून ईडीने दिल्ली जल बोर्डामधील कथित अनियमिततेविरोधात अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार, दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार आणि आपचे खासदार आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष एन. डी. गुप्ता यांच्या कार्यालयांसह एकूण 12 हून अधिक ठिकाणांवर धाडी घातल्या. या प्रकरणी ईडीने निवृत्त मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा आणि कंत्राटदार अनिलकुमार अग्रवाल यांना मागील आठवड्यात अटक केली आहे. हे दोघेही सध्या ईडी कोठडीत आहेत.
ईडीने आज कारवाईला सुरूवात केल्यानंतरही त्याला न जुमानता आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ईडीवर अनेक गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, आम्ही कारवाईला घाबरत नाही. ईडीने आतापर्यंत एक रुपयाचीही वसुली केलेली नाही. कोणताच पुरावा मिळालेला नाही. साक्ष घेताना दबाव आणून त्यांना आप विरोधात साक्ष द्यायला लावायची हा ईडीचा अजेंडा आहे. सर्व साक्षी-पुराव्यांची मोडतोड करण्याचे काम ईडी करीत आहे. एका साक्षीदाराला ईडीच्या अधिकार्‍यांनी इतक्या जोरात कानशिलात लगावली की, त्याच्या कानाचा पडदा फाटला. एका साक्षीदाराला सांगितले की, आपच्या नेत्यांविरोधात साक्ष दिली नाहीस तर तुझी मुलगी कॉलेजला कशी जाते ते बघू. साक्षीदारांना घाबरवून, धमकावून त्यांच्याकडून खोट्या साक्षी नोंदवल्या जात आहेत. या साक्षीदारांची साक्ष घेतानाचे व्हिडिओ चित्रीकरण ईडीने समोर आणले, पण त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून ऑडिओ डिलीट केला आहे. त्यामुळे साक्षीवेळी कोणते प्रश्‍न विचारले गेले, काय उत्तरे आली. हे कळतच नाही. साक्षीदारांना धमकावून त्यांची साक्ष घेतली जात असल्याने ऑडिओ डिलीट केले जात आहेत. किती साक्षीदारांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे? आम्हाला ते ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top