मुंबई-पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे.हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून यावेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे. या मार्गावर सुमारे १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले की,मध्य रेल्वेने नुकत्याच सेंट्रल लाईनवर वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यानंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल सुरू करण्याची तयारी केली आहे. नुकतीच मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक वातानुकूलित लोकल दाखल झाली असून ती हार्बर मार्गावर चालवली जाईल.चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या वातानुकूलित लोकलची निर्मिती करण्यात आली आहे.या लोकल आता मुंबईत दाखल झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सोमवार ते शनिवारदरम्यान हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल धावतील. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी या वेळेत सामान्य लोकल धावतील.या वातानुकूलित लोकल
सीएसएमटी- पनवेल, वाशी – वडाळा, वडाळा पनवेल,पनवेल – सीएसएमटी अशा धावणार आहेत. यातील सात लोकल अप आणि सात डाऊन मार्गावर धावणार आहेत.