नांदेड – ‘वंदे भारत’ या जलदगती रेल्वे गाडीच्या मार्गात हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्थानकही जोडावे, अशी मागणी महाराष्ट्र शीख असोसिएशनने केली आहे. महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईचे समन्वयक मलकीत सिंग बल यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतवीर सिंग उपस्थित होते.
सध्या वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख केंद्रांना जोड़ण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. देशातील अनेक धार्मिक स्थळांना वंदे भारतच्या मागनि जोडण्यात येत आहे. नांदेड येथील सचखंड श्री हुजुरसाहेब या तीर्थस्थळाला लाखोंच्या संख्येत भाविक भेट देतात. वंदे भारतच्या मार्गात नांदेडचा समावेश केला गेला, तर भाविकांना आणि मराठवाडयातील नागरिक तथा प्रवासी यांना त्याचा लाभ मिळेल.दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती, महाराष्ट्र शीख असोसिएशनचे सरदार दरजीत सिंग आणि मालकितसिंग बल यांनी दिली दिली आहे.