दिब्रुगढ – आसामच्या तुरूंगात कैदेत असलेला खलिस्तानवादी अमृतपाल सिंग हा लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आला आहे.त्याला लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेता यावी यासाठी चार दिवसांची पॅरोल रजा देण्यात आली आहे. उद्या शुक्रवार ५ जुलै रोजी तो खासदारकीची शपथ घेणार आहे.
अमृतपाल सिंग हा पंजाबच्या खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून १.९७ लाख मतांनी निवडून आलाआहे. त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आसामच्या तुरंगात ठेवण्यात आले आहे. तो तुरूंगात असताना त्याचा प्रचार त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच विविध धार्मिक संघटनांनी केला होता.दरम्यान,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बिअंत सिंग याचा नातलग सरबीजीत खालसा याने अमृतपाल पाच जुलैला शपथ घेणार असल्याचे संकेत अगोदरच दिले होते. मात्र,अमृतपालच्या कुटुंबीयांना या शपथविधी सोहळ्याबाबत काही कल्पना नाही.आम्हाला सोशल मीडियावरून हे कळत आहे,असा दावा त्याच्या मामाने केला आहे.