मुंबई – अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने केलेल्या नियुक्तीला आव्हान देणारी विजय पालांडे याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली. पालांडेवर दिल्लीस्थित व्यावसायिक अरुण टिक्कू यांच्या हत्येसह अन्य खुनाचे आरोप आहेत.टिक्कू हत्या खटल्यात निकम हे विशेष सरकारी वकील आहेत.
पालांडे याच्यावर खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी एका गुन्ह्यात अॅड उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पहात आहेत. मात्र नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक निकम यांनी भाजपाच्या तिकिटावर लढविली होती.निवडणुकीत उतरण्याआधी निकम यांनी नियमानुसार विशेष सरकारी वकीलपदाचा राजिनामा दिला होता. मात्र निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्य सरकारने निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकील पदावर नियुक्ती केली.
पालांडे यांनी आपल्या याचिकेत याच मुद्यावर न्यायालयाचे लक्ष वेधले होते. निकम हे राजकीय पक्षाचे सदस्य असून त्यांची विशेष सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यामागे सरकारचा कुटील डाव आहे. निकम हे भाजपाचा अजेंडाच पुढे रेटणार आहेत.असा युक्तिवाद पालांडेच्या वकिलांनी केला होता. मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.