शिमला- आज अष्टमीनिमित्त हिमाचल प्रदेशातील विविध शक्तीपीठांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी होती. सकाळपासूनच राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्वालाजी मंदिराबाहेर सकाळी ७ वाजल्यापासूनच शेकडो भाविक दर्शनासाठी थांबले होते. बिलासपूरमधील माँ नैना देवी मंदिर, सिरमौरमधील माँ बाला सुंदरी मंदिर, तसेच उना येथील चिंतापूर्णी मंदिरातही हीच परिस्थिती होती. उद्या रामनवमी आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत सुमारे ८लाख ७५ हजार भाविकांनी राज्यातील विविध शक्तीपीठांना भेट दिली आहे. विशेषत: ३ एप्रिल रोजी १.२४ लाख भाविकांनी मंदिरांत दर्शन घेतले. राज्यात येणाऱ्या भाविकांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली येथील भाविकांची संख्या अधिक असून, पश्चिम बंगालमधूनही अनेक भक्त शिमला येथील कालीबारी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.