अलिबाग – मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पूर्वी हाती रिपोर्ट लिहून दिला जात होता. हाती लिहिलेल्या रिपोर्टमध्ये खाडाखोड करून तो बदलला जाण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय म्हणून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आता डिजिटल रिपोर्ट दिला जात आहे.त्यामुळे शवविच्छेदन रिपोर्टमध्ये पारदर्शकता आली आहे.
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन अहवाल हा पूर्वी डॉक्टर हाती लेखी लिहून देत असत. यामुळे वेळही जात होता. हाती लिहिलेल्या अहवालात खाडाखोड करून हवा तसा अहवाल केला जात असे. यामुळे अहवालातून दिशाभूल केली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.त्यामुळे २०११ मध्ये न्यायलयाने डिजिटल अहवाल देण्याबाबत सूचना केलेल्या होत्या.मात्र,त्या अंमलात आणलेल्या नव्हत्या.त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी नव्याने आलेले डॉ.प्रवीण कानडे यांना डिजिटल अहवाल देण्याबाबत सूचना केल्या होत्या.त्यानुसार डॉ. कानडे यांनी शवविच्छेदनाचा अहवाल डिजिटल पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन केले जाते.