अरविंद केजरीवाल यांच्या नावावर ना घर ना कार, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्याआधी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अरविंद केजरीवाल यांनी संपत्तीबाबत माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार केजरीवाल यांच्याकडे कोणतीही कार नाही. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर बलेनो ही कार आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, अरविंद केजरीवाल यांच्याकडे 1 कोटी 73 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 10 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

अरविंद केजरीवाल यांची जंगम मालमत्ता

अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3 लाख 46 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आणि त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 89 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती 1 कोटी 77 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती 3 कोटी 99 लाख रुपये आहे.

केजरीवाल यांच्यावर कोणतेही कर्ज नाही

अरविंद केजरीवाल यांच्याकडे 50 हजार रुपये रोख रक्कम आहे, तर सुनीता केजरीवाल यांच्याकडे 42 हजार रुपये रोख रक्कम आहे. दोघांवरही कोणतेही कर्ज नाही. केजरीवाल यांच्या नावावर कोणते घरही नाही. सुनीता केजरीवाल यांच्या नावावर एक घर असून, त्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडेही बिगरशेती जमीन असून, त्यांची किंमत 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यांनी शेअर्स अथवा अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक देखील केलेली नाही.