Indian Immigrants: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ते आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या आदेशानंतर अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. अमेरिकेने बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीयांना परत मायदेशी पाठवण्यास सुरुवात केली आहे.
C-17 सैन्य विमान प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले असल्याचे सांगितले जाते. पुढील 24 तासात हे विमान भारतात दाखल होईल. प्रत्येकीची पडताळणी केल्यानंतरच त्यांना परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये कोणतेही कागदपत्रं नसताना व परवानगी नसताना अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतांश नागरिक हे पंजाबमधील असल्याचे सांगितले जाते.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या डिपोर्टिंग मोहिमेची घोषणा केली होती. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंटने जवळपास 15 लाख बेकायदेशीररित्या राहत असलेल्या नागरिकांची यादी तयार केली होती. यामध्ये 18,000 बेकायदेशीर भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, रिपोर्टनुसार अमेरिकेत सुमारे 7.25 लाख बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित राहतात. मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर भारतातील बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.