अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये विद्यार्थ्यांवर गोळीबार! ८ जखमी

फिलाडेल्फिया – अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे बसची वाट पाहत असलेल्या काही विद्यार्थ्यांवर अज्ञातांनी गोळीबार केला. काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
या हल्ल्यात ८ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला ९ गोळ्या लागल्या आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. इतर ७ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
फिलाडेल्फिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फिया हायस्कूलचे विद्यार्थी काल दुपारी बसस्थानकावर बसची वाट पाहत होते. त्यावेळी काही बंदुकधारी व्यक्ती त्यांच्या गाडीतून बाहेर आले. त्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. या विद्यार्थ्यांचे वय १५ ते १७ वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर किमान ३० वेळा गोळीबार केला. जखमींमध्ये एका विद्यार्थीनीचादेखील समावेश आहे. यामध्ये २ विद्यार्थ्यांचे वय १५ वर्षे, ५ विद्यार्थ्यांचे वय १६ वर्षे आणि एकाचे वय १७ वर्षे आहे. या गोळीबारात दक्षिण-पूर्व पेनसिल्व्हेनिया परिवहन प्राधिकरणाच्या दोन बसचेही नुकसान झाले. या बसवरही गोळीबार करण्यात आला. मात्र बसमधील प्रवाशांना व चालकांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top